नवम्बर 2026

भाषान्तरइकतीसवाँ दिन/एकतिसावा दिवस     Posted: November 1, 2026

अनुवाद — वसुधा सहस्रबुद्धे

तीच खूप जुनी समस्या होती ,दोन मुलांमध्ये विधवा आईच्या आयुष्याची वाटणी चालली होती .पंधरा- पंधरा दिवस ठीक होते परंतु एकतिसाव्या दिवसाचा खर्च कोण करणार ?दोन्ही भाऊ मिळून विचार करीत होते .म्हणजे योग्य निर्णय होईल आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही .खरंतर दोघेही आईला एक दिवस जास्त सांभाळायला समर्थ होते परंतु दोघांच्या मनात सुप्त ईर्षा होती की दुसऱ्या भावाचा खर्च त्याच्यापेक्षा कमी होऊ नये .मोठ्या मुलाने सुचवलं की एकतीस तारखेला आई कुठेही असली तरी होणारा  खर्च दोन्ही भावांनी वाटून घ्यायचा पण धाकटया मुलाला  ते पटलं नाही . कारण तो मोठ्या भावाचा लबाड स्वभाव ओळखत  होता. त्याला माहित होतं प्रत्येक वेळी एकतीस तारखेला आईची जबाबदारी त्याच्यावर टाकली जाईल आणि हिशोब देताना कटकट होईल. शेवटी लहान मुलाने यावर उपाय सुचविला , एकतीस तारखेला ताईकडे पाठवलं तर ? शेवटी मुलीची सुद्धा जबाबदारी असते .तिला भरपूर हुंडा दिला आहे ,त्याशिवाय सणावारालाही भरपूर काही दिलं जातंच… महिन्याचा एक दिवस ती आईला ठेवू शकत नाही का ?

आणि तसंही ती याच गावात रहाते म्हणजे कुठे बाहेर जायचं नाहीये . त्याने पटकन बहिणीला फोन लावला .जावई  सभ्य माणूस   होता. त्यांनी प्रस्ताव स्वीकारला आणि एवढंच म्हटलं ,” आम्हाला काही त्रास नाही,फक्त आईंना विचारा या वयात त्यांना मुलीच्या घरी रहायला आवडेल का ? त्या जुन्या विचाराच्या आहेत म्हणून ! “

दोन्ही भाऊ एक मताने एका सुरात म्हणाले ” यात आईला काय विचारायचं ? तिला काय जंगलात किंवा वृद्धाश्रमात पाठवतो आहोत का ?मुलीच्या घरी तर पाठवतो आहोत , ते सुद्धा फक्त एकतीस तारखेला ! म्हणजे वर्षातून फक्त सात दिवस .”  

जगाला दाखविण्यासाठी सगळ्यांच्या संमतीने सन्माननीय उपाय शोधला गेला .दोन्ही भावांना समाधान वाटलं .आईला काहीच विचारलं नाही .आता बिचाऱ्या आईचं एकदा इकडे आणि एकदा तिकडे असं सुरु झालं .तिची एक बॅग कायम भरून तयार असायची. कारण दर पंधरा दिवसांनी तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जायचं. आता आईचं हसणं नाहीसं झालं ,ती अगदी गप्प राहू लागली. पण एकतीस तारखेला तिचा चेहरा थोडा खुलायचा .ते बघून सुना आणि मुलांना त्रास व्हायचा. तिसऱ्या महिन्याच्या एकतीस तारखेला धाकटा मुलगा आईला बहिणीच्या घरी सोडून आला. अचानक तासाभरात आईच्या छातीत दुखू लागलं ,एक उचकी आली आणि आई हे जग सोडून गेली .रडारड झाली. संध्याकाळपर्यंत  अंत्यसंस्काराची तयारी झाली. सगळ्या लोकांबरोबर दोन्ही भाऊ दुःखी चेहऱ्याने उभे होते . शेवटच्या यात्रेसाठी तिरडी तयार होती… दोघे भाऊ आईला खांदा देण्यासाठी वाकले … अचानक एक कडक आवाज वातावरणात घुमला ..” थांबा ! “सगळे चकित झाले .खांदा द्यायला वाकलेले भाऊ पटकन उभे राहून आवाजाच्या दिशेकडे वळून बघू लागले. बहीण रणचंडी बनून उभी होती .तिचे डोळे आग ओकत होते .ती कठोर आवाजात म्हणाली ,” खबरदार ! तुम्ही दोघांनी आईच्या तिरडीला हात लावायचा नाही .आज एकतीस तारीख आहे ,आज आई माझ्या वाट्याला आहे ,तिच्या सगळ्या जबाबदारीतून तुम्ही आज मुक्त झाला आहात  .” एवढं बोलून ती वाकली आणि आईची तिरडी आपल्या खांद्यावर उचलून खड्या आवाजात म्हणाली ,” राम नाम ” ….तिच्या मागून आवाज आला …सत्य है .प्रेतयात्रा सुरु झाली त्यामध्ये एक खांदा मुलीचा होता ..दोघे भाऊ सर्वस्व लुटल्यासारखे दयनीय अवस्थेत गर्दीमागून चालू लागले .

अनुवाद — वसुधा सहस्रबुद्धे 

गतिविधियाँ

  • सम्पर्क:-

    सुकेश साहनी

    185,उत्सव,महानगर पार्ट–2
    बरेली–243122 (उ.प्र.)


    sahnisukesh@gmail.com

    रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´

    रचनाएँ भेजने के लिए ई-मेल-:-

    laghukatha89@gmail.com

    विशेष सूचना-:-

    पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

    केवल स्वीकृत रचनाओं की ही सूचना दी जाती है।

    -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine