अनुवाद –वसुधा सहस्रबुद्धे
पाऊस सतत पडत होता , थांबायचं नाव घेत नव्हता.फाटलेल्या छपरातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. गळणाऱ्या घरात ठिकठिकाणी ठेवलेली लहान मोठी भांडी पाण्याने पुन्हा पुन्हा भरत होती.
त्याची बायको आणि मुलं घाबरून कोपऱ्यात बसली होती. या त्रासदायक स्थितीत गळणाऱ्या छपरावर ताडपत्री घालण्याचा विचार करून कवी सुधाकर बाजारात जाण्यासाठी बाहेर पडला. तो चौकात पोहोचला असेल तेवढ्यात त्याला मागच्या बाजूने कोणी तरी हाक मारली.
” सुधाकर ,थांबा ना !” हाक मारणारा ओळखीचा लेखक मित्र होता.
” काय म्हणताय दादा ,बोला ना.”
” अरे ,हल्ली कुठे असता ? परवा श्रावण कवी संमेलन आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही पावसावर असं एखादं अप्रतिम गीत सादर करावं की श्रोते आनंदाने डोलायला लागतील. “
श्रावण आणि पावसाचं नाव ऐकताच त्याला आपल्या घराचं गळणारे छत दिसू लागलं आणि गळणारे पाणी सांभाळू न शकणारी भांडी त्याला वेडावू लागली.
” कसला विचार करताय ? अहो ,देशातील श्रेष्ठ कवीच्या उपस्थितीत कविता वाचन करणं अभिमानाची गोष्ट आहे. “
” ते सगळं ठीक आहे ,पण ……. मी खोटं बोलू शकणार नाही.”
अनुवाद
वसुधा सहस्रबुद्धे