अनुवादः वसुधा सहस्रबुद्धे
खडीमध्ये डांबर मिसळणाऱ्या मुलाच्या थोबाडीत मारून ठेकेदार ओरडला ,” काय रे ,बापाचा माल वाटला का ?”
मुसमुसत मुलाने सांगितलं , “साहेब कमी डांबर घालून खडी बरोबर बसत नव्हती ना !रस्ता चांगला व्हायला हवा म्हणून माप बरोबर केलं होतं.”
“अरे बाळा , माझ्या कामावर तू नवीन आला आहेस .एवढं डांबर घातलंस तर माझी ठेकेदारी तू बंद करशील! ”
मग त्या मुलाला समजावून सांगितलं , “बाळा ,या डांबरामध्ये कारकून ,इंजिनियर ,अधिकारी ,मंत्री सगळ्यांचे हिस्से असतात .वाईट रस्त्यावर मला सुद्धा धक्के बसतात . चल ,यामध्ये आणखी खडी चुरा घाल बघू .” मनातल्या मनात ठेकेदार खर्चाचा हिशोब करीत हॊता .
निराश मनाने मुलगा ठेकेदाराच्या सूचनेप्रमाणे काम करू लागला . त्याचा उतरलेला चेहरा बघून ठेकेदार म्हणाला ,” बाळा यामध्ये सगळ्यांचं पोट आहे .चांगला रस्ता बनवला आणि सहा महिन्यात खड्डे पडले नाहीत तर इंजिनियर साहेब पुढचं कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या ठेकेदाराला देतील . या खड्ड्यांमुळे सगळ्यांचं पोट भरतं , बाळा ! ”
-0-